इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण यादरम्यानच सनरायझर्स हैदराबादबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व इशान किशन (Ishan Kishan) करण्याची शक्यता आहे.
खरंतर आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) नेतृत्व पॅट कमिन्सने (Pat Cummins) केले होते. त्याच्या नेतृत्वात २०२४ मध्ये या संघाने अंतिम सामन्यापर्यंतही धडक मारली होती.
मात्र, सध्या कमिन्स आयपीएल २०२६ मध्ये हैदराबाद संघाशी कधी जोडला जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून कमिन्स दुखापतीचा सामना करत आहे. तो ऍशेस २०२५-२६ मालिकेतही केवळ एक सामना खेळला, तसेच त्याला दुखापतीमुळे टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धाही खेळता आली नव्हती.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सध्या सनरायझर्स हैदराबादचे व्यवस्थापनाने या संदर्भात चर्चा केली आहे. यातून इशान किशन हा पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करण्यासाठी आघाडीचा उमेदवार असल्याचे समजत आहे. अशात अभिषेक शर्मा उपकर्णधाराची भूमिका निभावू शकतो. इशान आणि अभिषेक हे दोघेही भारताच्या टी२० संघातील सध्याचे प्रमुख फलंदाज आहेत.
नुकत्याच झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेल्या भारतीय संघातही इशान आणि अभिषेकचा समावेश होता. इशानने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्याने ९ सामन्यात ३१७ धावा केल्या होत्या. तो संजू सॅमसननंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तसेच अभिषेकसाठी टी२० वर्ल्ड कपची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण अंतिम सामन्यात २१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती.
इशान किशन २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाला असून त्याने या हंगामात १४ सामन्यात ३५४ धावा केल्या होत्या. अभिषेक शर्मा २०१९ पासून या संघाचा भाग असून त्याने ७४ सामन्यांत १७५३ धावा केल्या आहेत.


