Thursday, March 19, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर आलिशान हॉटेलमध्ये आता लाकडाची चूल; हातगाडीवरील पोहे, वडा-भजी बंद, व्यावसायिकांसमोर अनेक...

कोल्हापूर आलिशान हॉटेलमध्ये आता लाकडाची चूल; हातगाडीवरील पोहे, वडा-भजी बंद, व्यावसायिकांसमोर अनेक आव्हाने

आलिशान हॉटेल, त्यामध्ये अत्याधुनिक स्वयंपाकघर, विविध प्रकारची उपकरणे; मात्र स्वयंपाकासाठी लाकडे असणारी चूल मांडली आहे. अशी विसंगती शहरातील विविध हॉटेल्समध्ये पाहायला मिळत आहे.

 

आखाती युद्धामुळे शहरातील व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्याचा हा परिणाम असून, हॉटेल व्यावसायिकांना एकाचवेळी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.

 

देशभरातील औद्योगिक आणि व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्याचा सर्वाधिक फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. आहे तो गॅस पुरवून वापरा असे आदेश असल्याने त्यांना ऊर्जेच्या पारंपरिक साधनांचा वापर करावा लागत आहे.

 

यासाठी सर्वात पटकन उपलब्ध असणारा पर्याय म्हणजे लाकूड. म्हणूनच हॉटेल चालकांनी लाकूड खरेदी केले आहे. चूल मांडून त्यामध्ये लाकडे पेटवून स्वयंपाक सुरू केला आहे. पाणी उकळणे, भात शिजवणे, मांसाहारी पदार्थ यासाठी चुलीचा उपयोग केला जात आहे, तर चपाती, भाजी व अन्य काही पदार्थांसाठीच गॅसचा उपयोग केला जातो.

 

जास्त गॅस लागणारे चायनीजसारखे पदार्थ बनवणे बंद केले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी आता वाढदिवस, पार्टी याचे बुकिंग घेणे बंद केले आहे. जेवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनाच सेवा दिली जात आहे. कोळशाच्या शेडगीचाही उपयोग विविध पदार्थ बनवण्यासाठी हॉटेलमध्ये होत आहे. पुढीच चार दिवस पुरेल इतकाच गॅस साठा बहुतांशी हॉटेलमध्ये असल्याने चार दिवसांच्या नंतर काय असा मोठा प्रश्न हॉटेल व्यवस्थापनांसमोर आहे.

 

भजी, वडा बंद

 

हातगाडीवर खाद्य पदार्थ विकणाऱ्यांची अवस्थाही गॅसअभावी बिकट झाली आहे. बहुतांशी जणांनी सकाळचा नाश्‍‍ता बंद ठेवला आहे. त्यामुळे आता वडा, भजी, कांदेपोहे, उपीट हे पदार्थ मिळणे दिवसेंदिवस अवघड होणार आहे. हातगाडीवाल्यांनी केवळ चहा, कॉफी, ताक असे पदार्थ ठेवण्यास सुरुवात केली आहे.

 

विद्यार्थ्यांची अडचण

 

शासनाने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना गॅस पुरवठा सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. मात्र, काही वसतिगृहांना आवश्यक तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे परगावच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

 

सिलिंडर द्या, जेवण करतो

 

जिल्ह्यात या महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराईचे मुहूर्त आहेत. मात्र, व्यावसायिक गॅस मिळणार नसल्याने केटरिंग व्यवसाय करण्यांची पंचाईत झाली आहे. ज्या ऑर्डर घेतल्या आहेत त्यांना तर सेवा द्यावीच लागेल. मात्र, नवीन ऑर्डर घेताना तुम्ही गॅस उपलब्ध करून द्या; तर ऑर्डर घेतो अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांनीही आता लाकूड वापरण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

 

जेवढा गॅस शिल्लक आहे, त्यावर ज्यांच्या ऑर्डर घेतल्या आहेत त्यांना सेवा देता येईल. मात्र, नवीन ऑर्डर घेताना त्यांच्याकडून गॅसच्या उपलब्धतेबद्दल विचारणा करावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -