भारतात सापडल्या कोविशिल्डच्या बनावट लसी, WHO कडून सतर्कतेचा इशारा

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने लसीकरण (vaccination) मोहीमेवर भर दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

लसीकरणामुळे कोरोनाची भिती काहीशी कमी होत असतानाच बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं यासंदर्भातील माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून दिली आहे. भारतामध्ये कोविशिल्ड लसीच्या ‘2 एमएल’च्या वायल्स आढळून आल्या आहेत. पण कोविशिल्डची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटकडून एमएलच्या वायल्स तयारच केल्याच जात नाहीत.

सिरम इन्स्टिट्युटनंही याला दुजोरा दिला आहे. युगांडामध्येही 10 ऑगस्टला एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच आढळून आली होती. त्यामुळे डब्ल्यूएचओने यासंदर्भात अधिक जागरुक राहण्याचं आवाहन केलं आहे. 
‘बनावट लसी जागतिक आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून कोरोना होण्याची शक्यता अधिक असलेल्या नागरिकांसाठी गंभीर ठरू शकतात. या बनावट लसी तातडीने शोधून काढून हटवणे हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे, असं WHO ने म्हटलं आहे. तसंच, बनावट लसींचा धोका लक्षात घेता डब्ल्यूएचओने सर्व हॉस्पिटल्स , क्लिनिक्स , आरोग्य केंद्रे , वितरक , फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवण्याचं आवाहन केलं आहे. 

Leave a Reply

Join our WhatsApp group