भारताला स्वतंत्र होऊन आज 74 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशात मोठ्या उत्साहात 75 वा स्वांतत्र्य दिन साजरा केला जातोय. देशातील कानाकोपऱ्यात कोरोना नियमांचे पालन करुन देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिन आणि गणंतत्र दिन या राष्ट्रीय सणांमध्ये नेमका फरक काय असतो, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. या दोन्ही राष्ट्रीय सणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ध्वज फडकावला जातो. याबाबत अनेकांना माहित नसतं.
तसेच यातील वेगळेपणाबाबतही माहित नसतं. यामध्ये नेमका फरक काय असतो, हे आपण स्वांतत्र्य दिनानिमित्ताने जाणून घेणार आहोत.
स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिन
आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, तर 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अस्तित्वात आले आणि भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
ध्वज फडकावण्याचेही वेगवेगळे नियम
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी राष्ट्रध्वज फडकवला जातो. पण दोन्ही प्रसंगी ध्वज फडकावण्याचे नियमही वेगळे आहेत. स्वातंत्र्यदिनी तिरंगा खालून दोरीने खेचून वर आणला जातो. नंतर तो फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हटलं जातं. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी बांधलेला असतो आणि तो फडकवला जातो.
दोन्ही कार्यक्रमांमधील फरक काय?
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला होणारे मुख्य कार्यक्रम राजधानी दिल्ली येथे आयोजित केला जातो, जिथे या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केलं जाते.
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवला जातो. तर 26 जानेवारीला राजपथावर ध्वजवंदन केलं जातं. स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान ध्वज फडकवतात तर 26 जानेवारीला राष्ट्रपती ध्वज फडकावतात.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इतर देशातील प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोणत्याही पाहुण्याला आमंत्रित केलं जात नाही.
प्रजासत्ताक दिनाचा समारोप हा 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीट समारंभाने होतो. तर स्वातंत्र्य दिनाचा सोहळा १५ ऑगस्टलाच संपतो.
प्रजासत्ताक दिनी देशाच्या लष्करी सामर्थ्याची आणि सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवलं जातं. तसेच देशवासियांसमोर निवडक राज्यांकडून चित्ररथाचं पथसंचलन केलं जातं.तर स्वातंत्र्यदिनी असा कोणताही सोहळा नसतो.