कर्नाटकने पाणी सोडल्याने महाराष्ट्र सरकारही आक्रमक

जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने दावा सांगितल्यानंतर या गावांमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटककडून जत तालुक्यात पाणी सोडण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी तातडीची बैठक बोलवली.

या बैठकीत जत तालुक्यातील गावांसाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. त्याचबरोबर उपसा सिंचन योजना आणि गावागावांतील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

विशेषतः जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यात द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांचा सिंचन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या बागांना दिवसा पाणी देता यावे, यासाठी भारनियमनाच्या वेळांमध्ये सवलत देण्यासाठी एमईआरसी आणि विविध यंत्रणांनी विशेष बाब सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले.

प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण, त्यासाठी पदभरती, शिक्षकांची पदभरती, शाळांसाठी आवश्यक निधीसाठी तरतूद याबाबत विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार करावेत. या भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत विविध विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पेट्रोल पंपवालेही म्हणतात, चलो कर्नाटक!
कर्नाटकात पेट्रोल व डिझेल स्वस्त आहे, त्यामुळे सीमाभागातील वाहनचालक कर्नाटकातच इंधन भरतात. यामुळे तेथील पंपांवर गर्दी, तर महाराष्ट्रातील पंप ओस अशी स्थिती आहे. परिणामी सीमाभागातील पेट्रोल पंपचालकांमध्येही आता कर्नाटकात जाण्याची भावना बळावत आहे.
nगेल्या १० वर्षांत इंधनाची सगळीच विक्री कर्नाटकने खेचून घेतली आहे. मिरज, जतमध्ये तर जवळपास अर्धा डझन पंपमालकांनी पंपांना कुलुपे लावली आहेत.

लोकांची माथी भडकवू नका; पोलिसांची तंबी
कोणतीही परवानगी न घेता कर्नाटकात जाण्यासाठी लोकांची माथी भडकविण्याचा प्रयत्न केला, तर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी पोलिसांनी दिली आहे.
nमागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागात महाराष्ट्र सरकारकडून सेवासुविधा मिळत नसल्याचे सांगत कर्नाटकात जाण्याच्या घोषणा देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले आणि त्यांना समज दिली.

योजनेला गती द्या…
विस्तारित उपसा सिंचन योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता ते प्रत्यक्ष काम सुरू होणे, यासाठी सर्वच पातळ्यांवर कार्यवाहीला गती द्या, अशा सूचना देताना विस्तारित योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधा, पाण्यापासून वंचित या गावांना दिलासा देण्यासाठी आणि या गावांसाठीच्या पाणी योजनांसाठी उद्भव स्त्रोत असणाऱ्या तलावांमध्ये वेळेत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कालबद्ध पद्धतीने नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Join our WhatsApp group