‘पुष्पा २’मध्ये सलमान खानच्या सिनेमातील खलनायकाची एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार फाइट

‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुन चर्चेत आहे.चाहतेही चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘पुष्पा: द रुल’ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा २’साठी अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. मात्र, आता या चित्रपटाचा भाग होण्यासाठी निर्मात्यांनी सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘टायगर जिंदा है’चा खलनायक सज्जाद डेलाफ्रूजशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, सज्जाद डेलाफ्रूज ‘पुष्पा २’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टायगर जिंदा है या चित्रपटात सज्जादने अबू उस्मानची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो केके मेनन आणि सैयामी खेर यांच्यासोबत ‘स्पेशल ऑप्स’मध्ये दिसला होता. नीरज पांडे निर्मित चित्रपटात सज्जादने हाफिज अलीची भूमिका साकारली होती. त्याने ‘अंडर द शॅडो’ या पर्शियन हॉरर थ्रिलरमध्येही छोटी भूमिका साकारली होती.

सज्जाद डेलाफ्रूज हा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे ज्याने टायगर जिंदा है, बेबी, द चॉईस आणि स्पेशल ऑप्स सारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. त्याला हिंदी, इंग्रजी, अरबी, फारसी आणि तुर्की भाषांचे चांगले ज्ञान आहे. टायगर जिंदामध्ये सलमान खानच्या विरुद्ध अबू उस्मान या भयानक खलनायकाच्या भूमिकेत तो प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.

अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटगृहात सुपरहिट ठरला होता. आता चाहत्यांच्या नजरा त्याच्या पुढच्या भागाकडे लागल्या आहेत. पुष्पा द रूप हा चंदन तस्करीच्या कथेवर आधारित पुष्पा फ्रँचायझीचा सीक्वल आहे. असे सांगितले जात आहे की त्याचे शूटिंग सुरू झाले आहे आणि यावेळी ते मेगा बजेटमध्ये बनवले जात आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी चांगलेच मानधन घेतल्याचीही चर्चा आहे.

Join our WhatsApp group