केंद्र सरकारच्या अग्निवीर भरती योजनेवरून देशात विरोधकांनी राजकीय घमासान माजवले असताना प्रत्यक्ष भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रिया यशस्वीरित्या राबवायला सुरुवात केल्याचे आज स्पष्ट झाले.अग्निवीरांची पहिली तुकडी आज 3 डिसेंबर 2022 रोजी देशसेवेत सामील झाली. नौदल प्रमुख एडमिरल हरी कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा रिपोर्ट समोर आला आहे. 3000 अग्निवीर नौदलात सामील झाले असून या अग्निवीरांमध्ये 341 महिला अग्निवीरांचा समावेश आहे, अशी माहिती एडमिरल हरी कुमार यांनी दिली आहे. त्याच वेळी सन 2023 मध्ये अग्निवीर भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि अधिक वेळा सुरू ठेवून जास्तीत जास्त अग्निवीरांची भरती भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही शाखांमध्ये केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारतीय नौदलात सामील झालेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत ज्या 341 महिला सामील झाल्या आहेत, त्या सध्या 7 – 8 शाखांपुरत्याच मर्यादित आहेत. परंतु, सन 2023 पासून नौदलाच्या तसेच भारतीय सैन्य दलाच्या बाकीच्या शाखांमध्ये देखील महिला अग्नीवीरांची भरती करण्यात येईल, अशी ग्वाही ऍडमिरल हरी कुमार यांनी दिली आहे.
जागतिक पातळीवरचे सामरिक आणि संरक्षण विषयक वातावरण लक्षात घेता आत्मनिर्भर भारताची गरज सर्वांच्याच लक्षात येत आहे. केंद्र सरकारने भारतीय सैन्य दलाला तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत आणि नौदलाची ही संपूर्ण देशाला कमिटमेंट आहे, की स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजे सन 2047 पर्यंत भारतीय नौदल आत्मनिर्भर झाले असेल, असे एडमिरल हरी कुमार यांनी स्पष्ट केले आहे.