इचलकरंजीचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आज अखेर १० हजार पत्रे रेल्वे कृती समितीकडे जमा ; तात्काळ प्रंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्याची व्यवस्था करणार : श्रीनिवास शर्मा

केंद्र व राज्य सरकारच्या चालू अर्थसंकल्पात नियोजित हातकणंगले – इचलकरंजी रेल्वे मार्गाला आर्थिक तरतूद व्हावी आणि इचलकरंजीकरांचे अनेक वर्षांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी इचलकरंजी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जवळपास १० हजार पत्रे पाठवून भावनिक साद घातली असल्याची माहिती रेल्वे कृती समितीचे कार्याध्यक्ष गुरुनात म्हातुकडे, सदस्य तथा रेल्वे प्रवाशी सल्लागार समिती सदस्य श्रीनिवास शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबाबत माहिती देताना म्हणाले, हातकणंगले – इचलकरंजी रेल्वेसाठी रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून सन २०११ सालापासून पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, रेल्वे मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे शहर असून देशभरातील लोक या शहराशी जोडले गेले आहेत. येथून मोठ्या प्रमाणात कापड व सूताची आवक-जावक होत असते. प्रवाशांची सोय तसेच रेल्वेचे उत्पन्न वाढ आदी बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. तर सामाजिक संघटना, यंत्रमागधारक संघटना, प्रोसेसधारक, सूत कापड व्यापाऱ्यांनीही रेल्वेला पाठींबा दिला व मागण्यांची निवेदने सादर केली.

वरील बाबींची केंद्र शासनाचे दखल घेत तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याचे लक्षात घेत हातकणंगले – इचलकरंजी या ९ किलोमीटर लांबीच्य रेल्वे मार्गास तत्वत: मंजूरी देत १६० कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले. तसेच रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या सर्व्हेलाही मंजूरी दिली. तसेच सन २०१७ मध्ये कराड येथून मा. सुरेश प्रभू यांनी व्हीसी द्वारे भूमीपुजन केले. रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने आपापला ५०-५० टक्केप्रमाणे हिस्सा उचलावा लागतो. त्यास केंद्राची तयारी आहे.

पण राज्य सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. रेल्वे कृती समिती याबाबत सतत पाठपुरावा करत असली तरी इचलकरंजी शहरातील सुजाण नागरिकांचे योगदान महत्वाचे असल्याने समितीच्या वतीने शहरातील सामाजिक संघटना, शालेय विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून आपल्या भावना व रेल्वेची गरज कळवावी असे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आजअखेर जवळपास १० हजार पत्रे रेल्वे कृती समितीकडे जमा झाली आहेत. ही सर्व पत्रे तात्काळ पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्याची व्यवस्था करणार असल्याचेही म्हातुकडे व शर्मा यांनी सांगितले.


यावेळी रेल्वे कृती समितीचे धर्मराज जाधव, नंदकुमार बांगड, मनोहर जोशी, दिपक पंडीत, महेंद्र जाधव, सागर रावण., विक्रांत ढवळे, प्रदीप कांबळे, बाळकृष्ण तोतला आणि महेंद्र बालर आदी उपस्थित होते.

Join our WhatsApp group