सुकन्या समृद्धी योजनेत महत्त्वाचे बदल, आत्ताच घ्या जाणून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तुमच्या मुलीच्या सुरक्षित आणि स्ववलंबी भविष्यासाठी तुम्ही योजना शोदथ असाल तर केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. ही एक दीर्घकालीन योजना असून या योजनेत गुंतवणूक केल्यास भविष्यात तुमच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पैशांची अडचण भासणार नाही. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित करू शकता.


या योजनेत तुम्हाला मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या गरजेनुसार गुंतवणूक करू शकता. या योजनेत आता काही मोठे बदल झाले आहेत. मुलींच्या भविष्यासाठी सरकार चालवत असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 7.60 टक्के व्याजदर मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला कलम 80C अंतर्गत आयकरातून सूटही मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेत झाले हे बदल
सुकन्या समृद्धी योजनेच्या बदललेल्या नियमांतर्गत खात्यात चुकीचे व्याज जमा झाल्यास ते बदलण्याची तरतूद हटवण्यात आली आहे. तसेच खात्यावरील वार्षिक व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केले जाईल. यापूर्वी ते तिमाही आधारावर खात्यात जमा केले जात होते.

पूर्वीच्या नियमांनुसार ज्या मुलीच्या नावावर खाते आहे ती 10 वर्षांची असताना खात्यातून व्यवहार करू शकत होती. परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. मुलींना आता 18 वर्षापूर्वी खाते ऑपरेट करण्याची परवानगी नसेल. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत फक्त तिचे पालक खाते चालवू शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात दरवर्षी किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. जर तुम्ही कोणतीही रक्कम जमा केली नाही तर तुमचे खाते डीफॉल्ट मानले जाते. खाते पुन्हा सक्रिय न केल्यास मुदतपूर्तीपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज जमा होत राहील. पूर्वी हा नियम नव्हता.

सुरुवातीच्या नियमांनुसार आयकर कलम 80C (80C) अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. परंतु आता पहिल्या मुलीनंतर दुसऱ्यांदा जुळ्या मुलींचा जन्म झाला तर तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलीसाठीही सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता.

मुलीचा मृत्यू झाल्यास किंवा मुलीचा पत्ता बदलल्यास ‘सुकन्या समृद्धी योजना’ खाते बंद करण्याची तरतूद यापूर्वी होती. मात्र आता त्यात खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश करण्यात आला आहे. आता पालकाच्या मृत्यूनंतरही खाते मुदतपूर्व बंद करून पैसे काढता येणार आहेत.

Join our WhatsApp group