भारतीय संरक्षण विभागात नौदलाची आहे महत्त्वाची भूमिका, असा आहे नौदल दिवसाचा इतिहास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतीय संरक्षण विभागात नौदलाची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या इतिहासात 4 डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. या दिवशी भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो. 4 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा नौदल दिवस हा केवळ एक ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन नाही तर भारतीय नौदलाला समजून घेण्याचा दिवस आहे. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास.



हा आहे भारतीय नौदल दिवसाचा इतिहास
ईस्ट इंडिया कंपनीने 1612 मध्ये भारतीय नौदलाची स्थापना केली. सन 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले होते. यात 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानने भारतीय विमानतळांवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय नौदलाने 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री हल्ल्याची योजना आखली. या ऑपरेशनला भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन त्रिशूल’ नाव दिले होते. या ऑपरेशन अंतर्गत कराची बंदर आणि तेथे असलेल्या पाकिस्तानच्या नौदल मुख्यालयाला लक्ष्य करून ही कारवाई सुरू करण्यात आली. या हल्ल्यासाठी भारताकडून एक मिसाईल बोट आणि दोन युद्धनौका पाठवण्यात आल्या होत्या. या युद्धनौकांनी रात्रीच कराची बंदराला वेढा घातला. भारतीय नौदलाने प्रथम कराचीच्या किनार्‍याजवळ जहाजांच्या एका गटावर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानची अनेक जहाजे उद्ध्वस्त झाली होती. सोबत पाकिस्तानचे तेल टँकरही उद्ध्वस्त करण्यात आले होते.

कराची बंदरात तेलाचा साठा करणाऱ्या टँकरमध्ये लागलेली ही आग इतकी भीषण होती की, 60 किलोमीटर अंतरावरून दिसत होती. पुढचे अनेक दिवस ही आग धगधगत होती. भारतीय नौदलाच्या या हल्ल्यात पाकिस्तानचा कराची नौदल तळ पूर्णपणे उद्ध्वस्त होत पाकिस्तानचे शेकडो सैनिक ठार झाले होते. तेव्हापासून, भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्याच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो.

Join our WhatsApp group