अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा, प्रियकराच्या मदतीने केली हत्या!


अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात ही घटना घडली आहे. पतीची हत्या झाल्याचे उघड होऊ नये यासाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराने कट रचला होता. अखेर शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू नसून हत्या असल्याचे उघड झाले. तब्बल चार महिन्यानंतर याप्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी संबंधित महिलेला तिच्या प्रियकरासह अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कमलकांत शाह असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. कमलकांत हे कपडा व्यवसायिक होते आणि ते सांताक्रुझ येते राहत होते. 2002 मध्ये त्यांचे लग्न कविता यांच्यासोबत झाले आणि त्यांना दोन मुलं आहेत. या सर्वांसोबत ते सांताक्रुझ येथील एका सोसायटीमध्ये राहत होते. ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रकृती अचानक खराब झाली. भिवंडी येथील कारखान्यावर असताना अचानक त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना अंधेरीतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण आठ ते दहा दिवसांच्या उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्तामध्ये काही रसायने आढळून आली. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला आझाद मैदान पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर सांताक्रुझ पोलिसांकडे याप्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला.

या तपासादरम्यान, पोलिसांनी कमलकांत यांच्या पत्नीची कसून चौकशी केली तर धक्कादायक माहिती समोर आली जी ऐकल्यानंतर पोलिसही थक्क झाले. कमलकांत यांच्या पत्नीनेच प्रियकर हितेशच्या मदतीने त्यांची हत्या केली असल्याची माहिती समोर आली. कमलकांत शाह यांची व्यवसायानिमित्त हितेश जैन यांच्यासोबत मैत्री झाली. यावेळी कमलकांत आणि हितेश यांचे नेहमी भेटणे व्हायचे. यातच कमलकांत यांची पत्नी कविता यांची हितेश यांच्यासोबत मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. कविता आणि हितेश यांच्या प्रेमामध्ये कमलकांत अडथळा ठरत होते. त्यामुळे दोघांनी कमलकांत यांच्या हत्येचा कट रचला, असल्याचे तपासात उघड झाले.

Join our WhatsApp group