“यांच्या स्वप्नात अफजलखान येतो आणि कानात…”; प्रसाद लाड यांनी शिवरायांविषयी केलेल्या विधानावर राऊतांची टीका

ताजी बातमी ऑनलाईन टीम

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला विधान भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रागडवारच त्यांनी स्वराज्यांची शपथ घेतली, असे विधान प्रसाद लाड यांनी केले आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.“प्रसाद लाड हे इतिहासकार आहेत का? भाजपचं डोकं फिरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार यांच्या पक्षाचे मुंडके छाटणार आहे. रोज कुणीतरी उठतो आणि शिवाजी महाराजांविषयी बोलतो. मला असं वाटायला लागलंय की रोज यांच्या स्वप्नात अफजलखान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात मंत्र देतो आणि हे बोलायला लागतात. शिवाजी महारांवर बोलण्याची यांची लायकी आहे का? शिवाजी महाराजांविषयी अख्ख्या जगाला माहिती आहे. भाजपने नव्या इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली आहे का? प्रसाद लाड आता महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहीणार का?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

आमदारांना इतिहासाचे धडे द्या

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सव कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत यांनी हे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली आहे. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे,” असे राष्ट्रवादीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड?

“स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कशासाठी असे तुम्ही विचाराल. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली आहे. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रागडवारच त्यांनी स्वराज्यांची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली,” असे प्रसाद लाड म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत प्रसाद लाड हे जवळ ठेवलेल्या चिठ्ठीमधून काहीतरी वाचत होते असेही दिसून आहे.

Join our WhatsApp group