नवीन वर्षाला निरोप देताना ‘या’ शब्दाचा वापर केलात तर होईल कारवाई

ताजी बातमी ऑनलाईन टीम

हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्याचसोबत अनेकदा विनोदी आणि विक्षिप्त पोस्टही व्हायरल होत असतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्यासाठी आणि मस्करीची कुस्करी होण्याची दाट शक्यता असते. आपल्याला अनेकदा सोशल मीडिया पोस्ट करताना फार काळजी घ्यावी लागते. कारण त्यानं अनेकांच्या भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. अनेकदा अशाच काही वादग्रस्त पोस्ट अथवा व्हिडीओज व्हायरल होत असतात त्यातून देशातील महापुरूषांवरही विडंबन करणाऱ्या पोस्ट व्हायरल होतात आणि त्यामुळे वादाला सुरूवात होते. अशावेळी जागरूकेतनं पोस्ट करणं, कमेंट करणं आवश्यक होऊन जातं. आपण सोशल मीडियाचा वापर करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची. नवीन वर्षाला निरोप देताना सोशल मिडियावर ‘तुका म्हणे’ असा शब्द प्रयोग करून मेसेज व्हायरल केले जातात.दरवर्षी अशा आशयाच्या शुभेच्छा, मित्र परिवार आणि आप्तेष्टांना देऊन महाराष्ट्रातील संतांचा अपमान केला जात असल्याचं देहू संस्थानच्या निरिक्षणास आल्यामुळे यामुळे देहु संस्थाननं आता कडक पावलं उचलली असून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना इशारा दिला आहे. नववर्षासाठी शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ हा शब्दप्रयोग केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केवळ संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुका म्हणे’ या शब्दाचे विडंबन केल्यावरच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह; महाराष्ट्रात असणाऱ्या संत, महापुरुष यांचा वापर केल्यास आणि विडंबन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देहु संस्थानने दिला आहे. त्यामुळे महापुरुष आणि संतांची नावे वापरुन कोणताही मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल करू नये असं आवाहन देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केले आहे.संतांच्या अभंगाची मोडतोड करून शुभेच्छा दिल्या जातात. तेव्हा त्यांच्या अभंगाचा किंवा त्यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर विडंबन करणाऱ्या पोस्ट व्हायरल करू नये, अन्यथा देहू संस्थानामार्फेत कडक कारवाई केली जाईल. संतांच्याच नावांचे नाही तर देशातील कुठल्याही महापुरूषांच्या नावाचं केलेलं विडबंन खपवून घेतलं जाणार नाही, अशी माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितले.

Join our WhatsApp group