केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संसदेत पोहचले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघा एक तास उरला आहे.11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान गॅस कंपन्यांनी 1 फेब्रुवारी रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमतींची घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी गॅस कंपनी इंडेनने गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले. गॅस कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला गॅसच्या किंमती जाहीर करतात. गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गॅस कंपन्यांनी LPG गॅसच्या किंमतीत 100 रुपयांची दरवाढ केली होती.
इंडेन कंपनीने घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती जाहीर केल्या. या किंमतीत कोणताही बदल केला नाही. दिल्लीत 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडर 1053 रुपयांना मिळेल. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी व्यावसायिकांना 1769 रुपये मोजावे लागणार आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 6 जुलैनंतर मोठा बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅस सिलिंडर 14.2 किलो असते. 2023 वर्षाची सुरुवात महागाईच्या झटक्याने झाली होती. पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढले होते.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर देशातील प्रमुख महानगारातील सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. दिल्लीत गॅस सिलिंडर 1769 रुपयांना, मुंबईत 1721 रुपये प्रति सिलिंडर, कोलकत्तामध्ये 1870 रुपये प्रति सिलिंडर तर चेन्नईत 1917 रुपये प्रति सिलिंडर असा भाव होता.
आज घोषीत केलेल्या नवीन दरांचा घरगुती गॅस सिलिंडरवर कोणताही फरक पडला नाही. घराचे बजेट कोलमडले नाही. मात्र यापूर्वी 400 ते 500 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर दुप्पटीपेक्षा ही महाग झाल्याने सर्वसामान्यांचा रोष मात्र कायम आहे. त्यातच सबसिडीची रक्कमही अवघ्या तीन ते चार रुपयांवर आल्याने हा थट्टेचा विषय झाला आहे.
गेल्यावर्षी, 2022 मध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतींनी जनतेला हैराण केले होते. देशात पेट्रोल-डिझेलचा भडका उडाला होता. तर घराचे बजेट सांभाळताना सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली होती. गेल्या वर्षी घरगुती LPG सिलिंडरच्या भावात एकूण 153.5 रुपयांची वाढ झाली आहे.
तर व्यावसायिक गॅसच्या किंमतींनी नवीन उच्चांक गाठला होता. व्यावसायिक गॅसच्या किंमतींनी 2000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील जेवणाची चंगळ कमी झाली होती. खवय्यांची मोठी नाराजी होती.
मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात घरगुती एलपीजी गॅसच्या किंमती सूसाट आहेत. 400 रुपयांच्या आतबाहेर मिळणारे सिलिंडर आज हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. यामध्ये जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पण गेल्या वर्षी 6 जुलै 2022 रोजी पासून किंमतीत मोठी वाढ झालेली नाही. सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे.