सर्वसामान्यांच्या पोटाची भूक भागवणारा वडापाव महागणार !

मुंबईकरांची शान असणारा, पोटाटी भूक भागवणारा व खिशाला सहज परवडेल असा वडापाव. वडापाव म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत. गरमागरम वडापाव व त्यासोबत तळलेली हिरवी मिरचीची चव काही औरच.अनेकांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण असणाऱ्या वडापावची खास ओळख आहे. जगभरात बॉबे बर्गर म्हणूनही वडापावला ओळखले जाते.कुठे गरमागरम वड्यासोबत लाल चटणी हिरवी मिरची मिळते तर कुठे त्याच वड्यासोबत पिठलं देखील मिळत. मुंबईत दादर, ठाणे, नवी मुंबईतील कीर्तीकर, गजानन, पनवेलकर अशा बऱ्याच ठिकाणी हा वडापाव खूपच प्रसिद्ध आहे.

परंतु, सर्वसामान्यांना आवडणारा वडापाव आता महाग होणार व प्रत्येकाच्या खिशाला कात्री बसणार आहे. या दरवाढीमुळे संपूर्ण मुंबईला चटके बसले आहेत. १२ रुपयांवरून १५, १५वरून २० रुपयांवर पोहोचलेल्या वडापावला पुन्हा दरवाढीचा ठसका लागला आहे. वडापावच्या किमतीमध्ये दोन ते चार रुपयांनी आधी देखील वाढ झाली होती सध्या पूर्व उपनगरामध्ये १५ रुपयांचा वडापाव १८ ते २० तर मुख्य शहरात २० रुपयांचा वडापाव २२ ते २४ रुपयांपर्यंत मिळतो.

आधीच महागाईचे चटके सोसत असताना पुन्हा एकदा वडापाव प्रेमींना ३ ते ४ रुपये एक्स्ट्रा मोजावे लागणार आहेत. कारण चणाडाळ, डाळीच्या, तेलाच्या, हिरव्या मसाल्याच्या वाढलेल्या दराचा चटका वडापावसह भजीप्लेटलाही बसला होता.

वडापावचा मुख्य घटक असणाऱ्या पावाच्या लादीमध्ये 5 फेब्रुवारीपासून १० टक्के वाढ होणार आहे. पावाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने बेकर्स असोसिएशन ने पावाच्या दरात वाढ करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वडापावच्या किमती पुन्हा एकदा १ ते २ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp group