शहराच्या वाढीव भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.या भागातील नागरिकांना पुरेशा दाबाने व मुबलक पाणी मिळणार असून पाणीटंचाईच्या कटकटीतून कायमची मुक्तता होणार आहे. त्यासाठी वाढीव भागात पाच नवीन जलकुंभ बाधण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
औद्योगिकरणामुळे काही वर्षात शहराचा विस्तार अवाढव्य वाढत गेला आहे. पण त्याप्रमाणात नागरी सुविधा पुरवताना महापालिका प्रशासनाला मात्र कसरत करावी लागत आहे. यापैकीच पाणीपुरवठ्याचा प्रश्न वाढीव परिसरात गंभीर बनला आहे.
पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्यामुळे सातत्याने वाढीव भागात पाण्याची टंचाई जाणवते. परिणामी, नागरिकांना पर्यायी जलस्रोतावर अवलंबून रहावे लागते. तर स्थानिक लोकप्रतिनिधींनाही हा विषय सातत्याने त्रासदायक ठरत आला आहे.
यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक भागात जलकुंभ उभारण्याबाबत नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. शहरात जुने १५ जलकुंभ आहेत. यातील सांगली नाका परिसरातील एक जलकुंभ खराब झाल्याने बंद आहे.
काही जलकुंभांची दुरुस्ती करून वापरात आणलेले आहेत. दुसरीकडे नवीन तीन जलकुंभांचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र, गुरू चित्रमंदिर परिसर व साईट क्रमांक १०२ येथे नवीन जलकुंभ नजीकच्या काळात पूर्णत्वास गेल्याचे दिसणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
मात्र, अद्यापही शहराचा बराचसा वाढीव भाग पाण्यासाठी सतत तहानलेला आहे. पुरेसे पाणी येत नसल्यामुळे नळांना विद्युत मोटारी लावण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यातून आता सुटका होण्याची वेळ आली आहे. महापालिका प्रशासनाकडून अशा वाढीव भागात नविन जलकुंभ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
पाच ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २५ कोटीचे अंदाजपत्रक पाणीपुरवठा विभागाकडून तयार केले आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली. त्याच्या मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींच्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
७५ हजार नागरिकांची होणार सोय
नवीन पाच जलकुंभ उभारण्यात आल्यानंतर सुमारे ७५ हजार नागरिकांची सोय होणार आहे. यामध्ये १५ हजार नळांना मुबलक पाणी येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमपणे निकालात निघणार आहे. किंबहूना पाण्यासाठी महिलांचे होणारे हाल थांबणार आहेत.