शिरोळात थोर युगपुरुषांविषयी तरूणाने ठेवले आक्षेपार्ह स्टेटस; गुन्हा दाखल करणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, गावकऱ्यांची बंदची हाक

शिरोळ येथील एका महाविद्यालयातील तरुणाने थोर पुरुषाविषयक आक्षेपार्ह व्हिडिओ ठेवून ते सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. निहाल शफिक शेख ( राहणार बेगर वसाहत शिरोळ) असे या तरूणाचे नाव आहे. या तरुणावर शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता.18) रोजी घडली. याबाबतची फिर्याद स्वानंद पाटील याने दिल्याने त्याच्यावर अज्ञात तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शिरोळ जयसिंगपूर रोडवरील केपीटी जवळ घडली.स्वानंद पाटील याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्यावर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी आज शिरोळ शहर बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे. शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला असून, शहरातून पोलीस संचलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.

याबाबतची माहिती अशी की, येथील महाविद्यालयातील शिक्षण घेणारा निहाल शेख याने थोर पुरुषाविषयक आक्षेपार्ह व्हिडिओ ठेवून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी त्याच्यावर शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद देणाऱ्या स्वानंद पाटील याच्यावर शुक्रवारी रात्री अज्ञातानी चाकू हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला केला. पाटील या तरुणाच्या छातीवर, हात, मनगटावर वार केल्याने मोठी दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहरातील शेकडो तरुणांनी संताप व्यक्त करून भ्याड हल्ला करणाऱ्यांच्या वर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी तक्ता जवळ एकत्र जमून संध्याकाळी सात वाजेपर्यंत गुन्हेगारांच्यावर कडक कारवाई न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बजरंग काळे, कोल्हापूर जिल्हा युवा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, दत्तचे संचालक दरगु गावडे,धनाजी पाटील, नरंदेकर पंडित काळे, डी. आर, पाटील, अक्षय पाटील, प्रतीक धर्माधिकारी, भूषण गंगावणे, टिलू देसाई, प्रवीण चिडमुंगे, रणजीत माने यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. शिवाजी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

शिरोळ शहर मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी संबंधित हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या बरोबरच व राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी लेखी मागणी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना दिली. प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी यावेळी सांगितले कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सायंकाळी पाच वाजता दोन्ही समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.येथील या कॉलेजच्या व्यवस्थापकानी या तरुणाला कॉलेजमधून काढून टाकल्याचे पत्र इचलकरंजी येथील आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लेखी दिले आहे.

Join our WhatsApp group