देशातील अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही राज्यांमध्ये विजेच्या गडगडाटांसह पाऊस आणि गारपीट होत आहे. २९ मार्चपर्यंत देशभरातील वातावरण कोरडे असणार आहे.
३० मार्चपासून नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येणार असून, वायव्य भारतात ३० व ३१ मार्चला विजांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता आहे. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर वायव्य भारतात गडगटासह पाऊस सुरूच आहे. ३० मार्चला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेशमध्ये तर राज्यस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. ३० मार्चला छत्तीसगढ, विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये देखील गारपीटची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच उत्तर, दक्षिण, पूर्व भारतातील काही जिल्यांमध्ये देखील १ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्मिती होऊन ते उत्तरेकडे सरकत असल्याने उत्तर भारतात याचा प्रभाव जाणवत आहे. यामुळे छत्तीसगढ ते तमिळनाडू आणि दुसरीकडे बिहार ते ओडिसा अखंड वारे वाहत आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावरही होत असून, काही प्रमाणात पहाटेच्या वेळात गारवा जाणवत आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे गुजरात, दक्षिण भारताची किनारपट्टी आणि विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान या भागातील तापमानात किंचितशी वाढ होणार आहे. तसेच ३० ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांना गारपीट आणि गडगडाटांसह हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.