किरकोळ कारणावरून जावयाने सासूवर चाकूने वार करत जखमी केले. सौ. अरुणा व्यंकटेश गायकवाड ( वय ६० रा. बुधगाव, सांगली) या जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सुदाम दत्तात्रय सावरतकर ( वय ५० रा. कृष्णानगर) याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना शहापूर येथील कृष्णानगर गल्ली नंबर ३ मध्ये घडली. मुलगी आजारी असल्याने सौ. अरुणा गायकवाड या मुलीकडे आल्या होत्या. मुलीवर उपचार करून त्या शहापूर येथील घरी आल्या. यावेळी जावई सुदाम सावरतकर हा घरी आल्यानंतर सौ. गायकवाड यांनी त्याला माझ्या मुलीकडे लक्ष देणार नसशील तर माहेरी घेवून जाणार असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादात सावरतकर याने पॅन्टच्या खिशात लपवून ठेवलेले चाकू सारखे हत्यार बाहेर काढले. आणि सासू सौ. गायकवाड यांच्या डाव्या कानाच्या बाजूला गालावर वार करून जखमी केले. जखमी सौ. अरुणा गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार सुदाम सावरतकर यांच्यावर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.