ताजी बातमी ऑनलाईन टीम
यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करूनही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे २१ मे रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय कामगार नेते भरमा कांबळे यांनी जाहीर केला. यंत्रमाग कामगारांच्या परिषदेत ते बोलत होते.
भरमा कांबळे म्हणाले कि, यंत्रमाग कामगारांना १२-१२ तास काम करूनही संसार चालवण्यासाठी आवश्यक पगार मिळत नाही. त्यामुळे कायद्यानुसार किमान वेतन मिळावे. कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, महागाई भत्त्याप्रमाणे मजुरीवाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी यंत्रमाग कामगार संघटना
संयुक्त कृती समितीच्यावतीने -सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदने दिली. प्रसंगी आंदोलने केली.
मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने कामगारांना जगणे अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीने कामगार संपर्क अभियान सप्ताह राबवून कामगारांची परिषद घेतली. प्रारंभी सुभाष कांबळे यांनी परिषदेचा उद्देश विषद केला. यावेळी शिवानंद पाटील, हनुमंत लोहार, संजय टेके, शिवाजी भोसले, रंगराव बोंद्रे, कॉ. आनंदा गुरव, राजेंद्र निकम कुरुंदवाडचे काशीनाथ शिकलगार, सदाशिव यादव यांनीही मनोगत व्यक्त केले.
परिषदेचे अध्यक्ष सुनिल बारवाडे यांनी महागाई भत्ता पिसरेट मध्ये रुपांतरीत करुन दरवर्षी मजुरीवाढ देणेचा निर्णय झाला. पण या
निर्णयाला कारखानदारांनी हरताळ फासल्याचे सांगितले. यावेळी किमान वेतन कायद्याची पुनर्रचना करावी, यंत्रमाग उद्योगातील कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करा, महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या मागणीचे ठरावही करण्यात आले. अखेर भरमा कांबळे यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २१ मे रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. परिषदेस कामगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि शहर परिसरातील यंत्रमाग कामगार
उपस्थित होते.