पूरग्रस्तांच्या मागण्यांविषयी मुंबईत बैठक, मुख्यमंत्री ठाकरे यांचे राजू शेट्टी यांना निमंत्रण


पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रयाग चिखली येथून आक्रोश पूरग्रस्तांचा.. परिक्रमा पंचगंगेची.. दि. १ सप्टेंबर रोजी सुरू केलेली पदयात्रा रविवारी सायंकाळी पाच वाजता नृसिंहवाडी येथे विसर्जित झाली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांच्या मागण्याविषयी सोमवारी दुपारी तीन वाजता बैठकीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी जलसमाधीचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच ठरणार आहे.
पदयात्रेत हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. मानसांच्या अफाट गर्दीने विक्रम केला. पाण्याच्या महापुरानंतर पहिल्यांदाच माणसांचा महापूर पाहायला मिळाला नृसिंहवाडी बस स्थानकात आयोजित सभेत शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. राज्यातले व केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे त्यांनी सांगितले.


कर्जे बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना देण्यासाठी सरकारकडे ३ हजार कोटी रुपये आहेत. मग शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे का नाहीत? असा सवाल करून ते म्हणाले, केंद्र सरकारकडे नैसर्गिक आपत्तीसाठी तरतुद करण्यात आलेला मुबलक निधी आहे.

त्यातून राज्यातील पूर बाधित शेतकऱ्यांना मदत करावी. राज्य सरकारने प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये अनुदानाची केलेली घोषणा तात्काळ पूर्ण करावी. अशी मागणी करून सरकारला स्वाभिमानी बरोबर शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी सभेत दिला.


राजू शेट्टी यांनी जलसमाधीचा दिलेला इशारा, मुख्यमंत्र्यांचे बैठकीसाठीचे निमंत्रण, पूरग्रस्तांच्या मागण्या आणि तीव्र भावना याचा मध्य साधत शेतकऱ्यांकडून बैठकीसाठी होकार घेतला. सभेत बैठकीला जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला परंतु तांत्रिक अडचणीतून मार्ग काढावयाचा असेल तर मुंबई येथील बैठक करावी लागेल असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.


त्याच बरोबर एकदा बैठक करून तरी बघू काय होते ते, नाहीतर तुम्ही, माझ्यासोबतच आहात सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असा निर्वाळा दिल्या नंतर शेतकऱ्यांनी शेट्टी यांच्यावर विश्वास ठेवत वज्रमूठ बांधली. रविवारी परिक्रमा पदयात्रा समाप्ती नंतरच्या सभेत शेतकऱ्यांना मागण्या मान्य होण्याविषयी उत्सुकता लागून होती. परंतु याचा निर्णय आज सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे.

पदयात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली होती. कृष्णा पंचगंगा नदी संगम घाटावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नदीपात्राच्या सहा किलोमीटर परिघामध्ये पाण्यात जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. याशिवाय १० यांत्रिकी बोटी व रेस्क्यू फोर्सचे जवान सज्ज ठेवले होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group