जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंना इशारा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नाशिक येथील मालेगाव येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. ज्यावेळी माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात आणि देशात भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांना दिला आहे.बाळासाहेबांनी यांना मोठं केलं. परंतु आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली. मात्र, तुम्ही आमचे आई -बाप काढता. आम्ही मात्र, शिवसेना येके शिवसेना येके करत राहिलो. कधी वेळ काळ पाहिला नाही. शिवसेना अशीच मोठी झाली नाही, बाळासाहेबांनी कार्यकर्ते तयार केले त्यातून शिवसेना मोठी झाली. कुणावर आरोप प्रत्यारोप करण्याचा माझा स्वभाव नाही. परंतु ज्या राष्ट्रवादी व काँग्रेसला बाळासाहेबांनी थारा दिला नाही त्यांना तुम्ही जवळ केले. तुम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेशी विश्वासघात केला. मुंबईत दाऊदने बॉम्बस्फॉट घडवले. दाऊदशी कनेक्शन निघाले अशा मंत्र्यांना तुम्हाला पाठिशी घालण्याची वेळ आली. मग सांगा गद्दारी तुम्ही केली की आम्ही केली? असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Join our WhatsApp group