पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? कंपन्यांना लिटरमागे १४ रुपयांचा तोटा; २ वर्षांत प्रथमच मोठे नुकसान

सध्या जगभरात तेलाच्या किमती उतरल्या असल्या तरी तेल कंपन्यांना मात्र नुकसान होत आहे. इंडियन ऑइलने एप्रिल-जून तिमाहीत पेट्रोल आणि डिझेलची विक्री १० रुपये आणि १४ रुपये प्रतिलिटरच्या तोट्यात केली.

यामुळे दोन वर्षांत प्रथमच आयओसीने तिमाही तोटा नोंदवला आहे. कंपन्यांना नुकसान होत असल्याने देशात पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागण्याची चिन्हे आहेत.

आयओसीला एप्रिल जूनमध्ये दोन वर्षात प्रथमच १,९९२ कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. मागील मागील वर्षी याच कालावधीत ५,९४१.३७ कोटी रुपयांचा आणि जानेवारी-मार्च तिमाहीत ६,०२१.९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपन्यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी इंधनदरात वाढ करणे थांबवले होते. निवडणुका होताच १३७ दिवसांनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात एकूण १४ वेळा वाढ करण्यात आली होती.

३६५ दिवसांत ७८ वेळा वाढल्या किमती
गेल्या ३६४ दिवसांत म्हणजेच एका वर्षात सरकारने पेट्रोलच्या दरात ७८ वेळा वाढ केली असून केवळ ७ वेळा कमी केली आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात ७६ वेळा वाढ करण्यात आली असून १० वेळा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

प्रतिलिटर १० रुपयांनी दरवाढ
निवडणुकीनंतर दरात प्रतिलिटर १० रुपयांनी दरवाढ झाली. मात्र, त्यानंतर मे महिन्यात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात आठ रुपयांनी तर डिझेलवर सहा रुपयांची कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल ९.५ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

भारताला तेल कसे मिळतेय?
रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर आहेत. कच्च्या तेलाची किंमत बऱ्याच महिन्यांपासून प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास आहेत. किमती ९३ डॉलरपर्यंत खाली आल्या होत्या. सध्या भारत रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करत आहे. त्याचा मोठा फायदा सरकारला होत असतानाही नागरिकांवर मात्र महाग इंधन खरेदीची वेळ आली आहे.

Join our WhatsApp group