ताजी बातमी ऑनलाईन टीम
दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटात सापडलेले सण-उत्सव राज्य शासनाने बंधनमुक्त केले आहेत. त्याच अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तीचे विसर्जन पूर्वीप्रमाणे पंचगंगा नदीतच करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन ताराराणी पक्षाच्यावतीने विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांना दिले.
निवेदनात, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सर्व सण, उत्सव खुलेपणाने साजरे करण्यास परवानगी दिली आहे. याद्वारे दोन वर्षे दबलेल्या उत्साहाला शासनाने मोकळीक दिली आहे. प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित होण्यापूर्वी इचलकरंजी शहर व परिसरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तीचे विसर्जन हे पंचगंगा नदीमध्येच केले जात होते. तीन वर्षापासून श्रींचे विसर्जन हे पंचगंगा नदीऐवजी शहापूर खणीत करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. मात्र आता राज्य शासनाने सणउत्सव बंधनमुक्त केल्याने सर्वांच्या जनभावना आणि उत्सव यांचा विचार करुन प्रशासाने यंदा घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाचा स्विकार उपायुक्त डॉ. प्रदीप ठेगल यांनी केला. या शिष्टमंडळात अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, शंकर येसाटे, एम. के. कांबळे, नरसिंह पारीक, अविनाश कांबळे, शैलेश गोरे, बजरंग कुंभार, राजू दरीबे, विजय देसाई आदींचा समावेश होता.