केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची मोठी घोषणा, देशात लवकरच सुरु होणार इलेक्ट्रिक हायवे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशात इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहनधारक हैराण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलसह आता सीएनजीचेही दर गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले. परिणामी लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले असून रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढलेली दिसत आहे. अशात इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

देशातून (India) पेट्रोल-डिझेल हद्दपार होण्याची चिन्ह दिसत आहेत. यादृष्टीने केंद्र सरकार प्रयत्न देखील करत आहे. सोमवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात मोठी घोषणा देखील केली. त्यानुसार देशात लवकरच इलेक्ट्रिक हायवे सुरु होणार असून यावर काम देखील सुरु झाले असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात सांगितले की, सरकार सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत महामार्ग विकसित करण्यावर काम करत आहे, ज्यामुळे हेवी ड्युटी ट्रक आणि बसेस चार्ज करणे शक्य होईल. यामुळे अवजड मालवाहतूक करणारे इलेक्ट्रिक ट्रक आणि बस यांचं चार्जिंग महामार्गावरच होऊ शकेल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारीत चार्जिंग प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ट्रकसारखी अवजड वाहने आणि बस यांना न थांबताच चार्जिंग करणं सुलभ होणार आहे.

ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे
यासह नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही 26 ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे बनवत आहोत. PM गति शक्ती मास्टर प्लान लॉन्च केल्यामुळे, प्रकल्पांना जलद मंजुरी मिळेल आणि यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल. त्यांनी अमेरिकन गुंतवणूकदारांना भारतातील लॉजिस्टिक, रोपवे आणि केबल कार क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत सुमारे 3 कोटी झाडे लावण्यात येणार असून महामार्गाच्या बांधकाम आणि विस्तारीकरण दरम्यान शासन वृक्षारोपण पद्धती अवलंबत असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये 27 हजार झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

Join our WhatsApp group