इचलकरंजी ; शहापूरमध्ये घरफोडी दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहापूर येथील म्हाडा कॉलनीत बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या, चांदीचे दागिने असा १ लाख ९१ हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात रुपाली श्रावणकुमार मुडशी (वय ४५ रा. म्हाडा कॉलनी) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या रुपाली मुडशी या ११ सप्टेंबर रोजी माहेरी संकेश्वर येथे गेल्या आहेत. त्यांनी भाऊ सुरेश चंद्रकांत सारवाडे यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सारवाडे हे मुडशी यांच्या घराकडे गेले असता मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटल्याचे दिसून आले.

त्यांनी आत जावून पाहिले असता चोरट्यांनी लोखंडी तिजोरीतील रोख १ लाख रुपये, दिड तोळ्याच्या सोन्याच्या ३ अंगठ्या, अर्धा तोळ्याचे कानातील टॉप्स, २ ग्रॅमचा सोन्याचा तुकडा, चांदीचा कुंकवाचा करंडा, ब्रेसलेट असा सुमारे १ लाख ९१ हजाराचा ऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले. याबाबत मुडशी यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Join our WhatsApp group