इचलकरंजी; पैसे काढण्याच्या बहाण्याने ३१ हजाराची रोकड लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून बैंक खात्यावरील ३१ हजार ८०० रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या प्रकरणी सिकंदर निजाम नदाफ (वय ५५ रा. शिरदवाड) यांनी फिर्याद दिली आहे.सिकंदर नदाफ हे शिरदवाड (ता. शिरोळ) येथे राहण्यास असून ते चंदूर येथील यंत्रमाग कारखान्यात काम करतात. नदाफ यांचे स्टेट बँकेच्या शाखेत बचत खाते आहे. १२ सप्टेंबर रोजी नदाफ हे स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पैसे काढता आले नाही. त्याचवेळी त्यांच्या मागे असलेल्या ४० वर्षीय इसमाने मी पैसे काढून देतो असे सांगत नदाफ यांच्याकडील एटीएम घेतले. नदाफ यांनी त्याला पिन क्रमांकही दिला. त्यानेही थोडावेळ प्रयत्न केल्यानंतर पैसे येत नाही असे सांगत एटीएम कार्ड नदाफ यांना परत देऊन तो निघून गेला. त्यानंतर नदाफ हे बँकेत गेले व त्यांनी पैसे काढण्यासाठी स्लिप भरुन दिली. परंतु बँकेत त्यांच्या खात्यावर केवळ २० रुपयेच शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे संशय बेऊन त्यांनी एटीएम तपासले असता ते विजय कांबळे या नांवाचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे नदाफ यांनी बैंक स्टेटमेंट तपासले असता त्यांच्या खात्यावरुन दोन वेळा १ हजार रुपये व एकवेळा १३ हजार ८०० रुपये असे ३१ हजार ८०० रूपये काढण्यात आल्याचे समजले. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याप्रकरणी नदाफ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

Join our WhatsApp group