दाढी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा सलून चालकाने चिरला गळा, मृताच्या नातेवाईकांकडून सलून चालकाची हत्या!

नांदेडमध्ये दुहेरी (Nanded Murder News) हत्याकांडाची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट (Kinwat Crime News) तालुक्यातील बोधडीमध्ये ही घटना घडली आहे. या दोन हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. दाढी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची भांडणातून हत्या करण्यात आली. सलून चालकासोबत तरुणाचा वाद झाला होता. यावेळी सलून चालकाने दाढी करायच्या वस्त्र्यानेच तरुणाचा गळा चिरला. यामध्ये 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अज्ञात जमावाने तरुणाची हत्या (Murder) केल्याच्या रागात सलून चालकाचाही खून केला. हादरवून टाकणाऱ्या या दोन्हीही हत्या 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी झाल्या आहेत.

दाढी करायला गेला अन्…


किनवट तालुक्यात बोधडी येथे ही धक्कादाय घटना घडली. येथील व्यंकटी सुरेश देवकर हा 22 वर्षांचा तरुण गुरुवारी सायंकाळी दाढी करण्यासाठी सलूनमध्ये गेला. यावेळी अज्ञात कारणावरुन सलून चालकासोबत त्याचा वाद झाला. अनिल शिंदे (32) असं सलून चालकाचं नाव आहे. या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांमधील वाद इतका शिगेला पोहोचला की, अखेर संतापलेल्या अनिलने व्यंकटी याच्यावर दाढी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्राने वार केले. यामध्ये व्यंकटी हा गंभीर जखमी झाला.

वार केल्यानंतर पळून गेला सलून चालक

तरुणावर वार करुन सलून चालक अनिल शिंदे याने घाबरुन पळ काढला. यानंतर गंभीर अवस्थेतील व्यंकटीच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु होता. गळ्यावर रुमाल ठेवून व्यंकटी थोडा चालत देखील गेला. मात्र अखेर तो कोसळला. त्याने तेथेच प्राण सोडले. व्यंकटीच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या अज्ञात जमावाने अनिल शिंदेचा शोध घेतला. अनिल हा पळ काढत लपत होता. यावेळी संतप्त जमावाने त्याला शोधून काढून बेदम मारुन ठार केले. या घटनेनंतर बोधडी येथील मार्केटमध्ये असलेले त्याचे दुकान देखील पटवून देण्यात आले. यानंतर आरोपी हे पसार झाले आहेत. या घटनेने गावात एकच खळबळ माजली. गावामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी बोधडी गावातील बाजारपेठ बंद केली. या दुहेरी हत्याकांडाने नांदेड जिल्हा हादरला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Join our WhatsApp group