प्रचारात जेवण, दारु वाटप गुन्हा ठरणार; निवडणूक आयोग करणार कठोर नियम..

कोणतीही निवडणूक आली, की उमेदवारांकडून मतदारांना मोफत जेवण, दारू नि पैशांचे वाटप केलं जातं. ही बाब लक्षात आल्यावर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या नियमांत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोफत जेवण, दारू वाटप गुन्हा

आता मतदानापूर्वी मतदारांना हॉटेलात मोफत जेवण देणं, दारू पाजणं गुन्हा ठरणार आहे. पूर्वी मतदानाच्या 48 तासांआधी या गोष्टींना मनाई होती. आता त्यात आणखी वाढ केली जाणार असून, हा कालावधी 72 तासांचा केला जाणार आहे.

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा निवडणूक आचार संहितेच्या कक्षेत समावेश असेल. मतदार यादीत नाव नसले, तरीही 18 वर्षांवरील तरुणांना निवडणूक आचार संहितेच्या या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

निवडणुकीत पैसे वाटपाच्या नियमाबाबत याआधीच अत्यंत कठोर नियम केलेले आहेत. मात्र, आता रेस्टॉरंटमध्ये फुकटात जेवण देण्यावरही प्रतिबंध घातला जाणार आहे. अशा नियमाचा समावेश करण्याची निवडणूक आयोगाची पहिलीच वेळ आहे.

डिजिटल व्यवहारावर नजर

आता डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यावरही निवडणूक आयोगाची करडी नजर असेल. मतदारांना डिजिटल ट्रान्जेक्शन केल्यास तो गुन्हा मानला जाणार आहे.

Join our WhatsApp group