इचलकरंजीतले ‘आयजीएम’ रुग्णालयाचे रुप पालटले, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्याने गर्दी वाढली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयाचे रुपडे आता पालटले आहे. विविध सेवा-सुविधांसह अत्याधुनिक मशीनरीमुळे रुग्णालयात गर्दी वाढू लागली आहे. या सुविधांमध्ये वाढ होत जाऊन आगामी चार ते पाच महिन्यांत बर्न (जळीत विभाग), डायलेसेस, अपघातग्रस्त शस्त्रक्रिया असे विभागही पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय (आयजीएम) ची अवस्था खूपच बिकट बनली होती. त्यामुळे हे रुग्णालय सन २०१६ साली शासनाने ताब्यात घेतले. त्यानंतर हळूहळू काही सुविधा सुरू करण्यात आल्या. मात्र, वारंवार राजकीय टीकाटिप्पणीचा अड्डा बनल्याने नाहक बदनामी होऊन सुविधा सुरू होण्याचा कालावधी खूपच लांबला.

तब्बल पाच वर्षानंतर आता रुग्णालयाचे रुप बदलत आहे. अंतर्गत इमारत दुरूस्ती, रंगरंगोटी, आधुनिकीकरण केल्याने नवे रुप खुलून दिसत आहे. तसेच रुग्णांसाठी आवश्यक सेवा सुरू केल्याने गर्दीही वाढत आहे. नव्याने पदभार स्वीकारलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी रुग्णालयातील सर्वांचा एकमेकांशी समन्वय व योग्य नियोजन केल्याने अधिक फरक दिसत आहे. दररोज सुमारे ५०० बाह्यरुग्ण येतात. त्यातील अंदाजे १०० रुग्ण अॅडमिट होतात.

Join our WhatsApp group