PM Modi यांच्याकडून तरुणांना मोठं गिफ्ट, 75 हजार तरुणांना दिले अपॉइंटमेंट लेटर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या 10 लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा सुरू केला आहे. या रोजगार मेळाव्याचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी 75 हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर देत या रोजगार मेळाव्याला सुरुवात केली आहे. त्यासोबतच 50 केंद्रीय मंत्र्यांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळाव्याच्या (Rozgar Mela 2022) माध्यमातून जवळपास 20 हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर (Appointment Letter) दिल्याची माहिती समोर आले आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं गिफ्ट दिल्यामुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

75 हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर देत पंतप्रधानांनी या तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आजचा दिवस भारतातील युवा शक्तीसाठी महत्त्वाचा आहे. गेल्या 8 वर्षात देशात सुरू असलेल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोहीमेला आज आणखी एक दुवा जोडला जात आहे. रोजगार मेळाव्याची ही एक साखळी आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वावलंबी भारताच्या मार्गावर चालत आहोत. यामध्ये आमचे उद्योजक, शेतकरी, सुविधा आणि मॅन्युफॅक्चरिंग असोसिएट्स यांचा मोठा वाटा आहे.’ येत्या काही महिन्यांत लाखो तरुणांना भारत सरकारकडून वेळोवेळी अपॉइंटमेंट लेटर दिले जातील, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

पीएम मोदींनी पुढे सांगितले की, ‘कर्मयोगींचा संकल्प मोठा असतो. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 7-8 वर्षात आम्ही 10 वरून 5 वर झेप घेतली आहे. हे शक्य होत आहे कारण गेल्या 8 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणिवांमुळे अडथळे निर्माण होत होते त्या उणिवा आम्ही दूर केल्या आहेत. ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजने’अंतर्गत देशातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी मोठी मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत, स्किल इंडिया मोहिमेच्या मदतीने आतापर्यंत देशातील 1.25 कोटीहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.’

Join our WhatsApp group