पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस, जयसिंगपूर,उदगाव परिसरात अनेक घरे पाण्यात

परतीच्या पावसाने राज्यासह अनेक जिल्ह्याला झोडपून काढले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. मध्यरात्री जयसिंगपूर,उदगाव परिसरात ढगफुटी पावसाने अनेक घरात पाणी शिरलं. शेतीचे नुकसान झालेच याबरोबरच संसारपयोगी वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या.

शनिवारी परिसरात मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे सांगली-कोल्हापूर बायपास राज्य मार्गावर ओढयाचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.तसेच परिसरातील अनेक शेतीमध्ये पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी रात्री एक वाजल्यापासून ते पहाटे पाच पर्यंत विजेच्या गडगडासह मोठा पाऊस झाला.या ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. शिवाय परिसरात पाणी आल्याने घरे पाण्यात गेली.

सकल भागात तीन ते चार फूट पाणी शिलल्याने सिद्धेश्वर पार्क आणि यड्रावकर कॉलनी मधील २० ते २५ घरे पाण्यात गेली.

उदगाव येथील जुन्या टोल नाक्याजवळील सांगली-कोल्हापूर बायपास मार्ग वरील ओढा तुडुंब भरून वाहू लागला. यामुळे रस्त्यावर पाणी आले. शिवाय उदगाव ते जयसिंगपूर
रेल्वे स्टेशन कडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.

उदगाव परिसरात अनेक रोपवाटिका आहेत. त्या सर्व रोपवाटिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.सांगली कोल्हापूर रस्त्यालगत असणाऱ्या उदगाव ते जयसिंगपूर पर्यंत सर्वच शेतीमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.रोपवाटिकेतील पिकासह झेंडूंचे पिक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे एन दिवाळीत खूप मोठे नुकसान झाले आहे.

Join our WhatsApp group