फटाके फोडण्यावरुन झाला वाद, अल्पवयीन मुलांनी लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच केली तरुणाची हत्या!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये फटाके फोडण्यावरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले. धक्कादायक म्हणजे या किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. काचेच्या बाटलीमध्ये फटाके फोडू नका असा सल्ला दिल्याने तीन अल्पवयीन मुलांकडून एका 21 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुनील शंकर नायडू असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळाच दोन आरोपी तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर एका तरुणाचा शोध सुरु आहे.नेमके काय घडले?
सुनील शंकर नायडू हा तरुण गोवंडी शिवाजीनगर भागातील म्हाडा कॉलनीत हात होता. सोमवारी दुपारी त्याच्या इमारतीमधील एक बारा वर्षांचा मुलगा फटाके फोडत होता. त्याच्यासोबत त्याचे काही मित्र देखील होते. त्यामधील एकाने काचेच्या बाटलीमध्ये फटाके फोडण्यास सुरुवात केली. हे पाहून सुनिलने त्याने असे न करण्यास सांगितले. तो त्यांच्यावर ओरडला. तुम्ही असे केले तर काच सगळीकडे उडतील यामुळे इतरांना दुखापत होऊ शकते असे तो त्यांना म्हणाला. मात्र आपल्याला हटकल्यामुळ 12 वर्षीय मुलगा संतापला. त्याने ही घटना आपल्या 15 वर्षांचा भाऊ आणि एका मित्राला सांगितली. या तिघांनी सुनिलला दिवाळीच्या दिवशीच इमारतीजवळ घेरले. त्याला जबर मारहाण करण्यात आली. यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून करण्यात आला.

Join our WhatsApp group