इराण आणि अमेरिकेतील तणाव अद्यापही कमी झालेला नाही. गेल्या काही दिवसात धुसफूस कायम आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इंधन, नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली. जागतिक बाजारात महागाईला उकळी मिळाली. भारतात इंधन महागले. कधी पेट्रोल-डिझेल तर कधी एलपीजीच्या वाढत्या किंमतींनी नागरिकांचा खिसा कापला. आता सीएनजी महागला आहे. गेल्या चार महिन्यात सीएनजी जवळपास 10 रुपयांनी महागला. तर दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीची किंमत 3.89 रुपयांनी वाढली. मुंबईसह महाराष्ट्रात दरवाढीची कोणतीही माहिती समोर आली नाही. पण राज्यातही किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या चार महिन्यात 10 रुपयांनी वाढली किंमत
इराण आणि अमेरिका या दोन्ही देशात युद्धाचा भडका उडाला. कित्येक महिने हे देश एकमेकांवर हल्ले चढवत होते. यामुळे आखाती देशात इंधन पुरवठ्यावर आणि पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला. अनेक प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर 15 मे रोजी सीएनजीचा भाव वधारला. तर IGL ने 2 रुपयांच्या दरवाढीची घोषणा केली. 17 मे, 23 मे आणि 26 मे रोजी आयजीएलने हळूहळू सीएनजी महाग केला. 17 ते 26 मे दरम्यान म्हणजे 10 दिवसात सीएनजीचा भाव 6 रुपयांनी वाढला.
आता पुन्हा एकदा झटका
मे महिन्यानंतर आयजीएलने आता 29 ऑगस्ट रोजी सीएनजीच्या भावात वाढ केली आहे. आज दिल्लीसह एनसीआरमध्ये सीएनजीचा भाव 3 रुपये 89 पैशांनी वाढला. एकाच वर्षात सीएनजीत मोठी वाढ झाली आहे. आता दिल्ली एनसीआरमध्ये एक किलो सीएनजीची किंमत 86 रुपये 98 पैसे इतकी झाली आहे. तर चार महिन्याचा विचार करता एकूण 9.89 रुपयांची वाढ जाली आहे.
जुलैपासून किंमती दुप्पट
सूत्रांच्या माहितीनुसार, जुलैपासून जागतिक स्तरावर एलएनजीच्या किंमती दुप्पट झाल्या. आशिया जेकेएम एलएनजी बेंचमार्क या वर्षी फेब्रुवारीमधील प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्स 11 डॉलरवरून ऑगस्टमध्ये 23.4 डॉलरपर्यंत वाढला. पश्चिम आशियातील संकट गडद झाल्याने होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम झाल्याने जुलैपासून किंमती दुप्पट वाढल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात सीएनजी किंमत कितीने वधारली याची माहिती हाती आली नाही.


