कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ६० कोटी ७४ लाखांचा आर्थिक अपहार झाल्याचे लेखापरीक्षणातून उघड झाले आहे. या प्रकरणी ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने ३१ ऑगस्टला फेटाळला. त्यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता आहे.
तत्कालीन कार्याध्यक्षा आणि सचिव गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता आहेत. त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. मौदेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी वकील ॲड. प्रतिभा जाधव यांनी युक्तिवाद केला.
या प्रकरणी मुंबई येथील धर्मादाय आयुक्त मुख्यालयातील देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकरी यांनी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी, तसेच ट्रस्टचे सर्व संबंधित सदस्य, जबाबदार पदाधिकाऱ्यांविरुद्ध विविध आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी गुन्हा नोंदविला. धर्मादाय विभागाने केलेल्या चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई झाली.
मार्च २०२० ते मार्च २०२६ या सहा वर्षांच्या कालावधीत ट्रस्टच्या निधीचा कथित गैरवापर, आर्थिक व्यवहारांत अनियमितता, लेखापरीक्षणातील त्रुटींसह देवस्थानच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता झाल्याचा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला. त्यांचा युक्तिवाद आणि पोलिस प्रशासनाचा अहवाल ग्राह्य मानून दोघांचाही अटकपूर्व जामीन नामंजूर केला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, एआयटीचे निरीक्षक हेमंतकुमार शहा करत आहेत.
