एलपीजी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजीच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाल्यानंतर तेल कंपन्यांनी सिलिंडर रिफिल बुकिंगच्या कालावधीत बदल केले होते.
आता केंद्र सरकारने विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलासा देत रिफिल बुकिंगचा कालावधी कमी केला आहे. हा नवीन बदल सर्वत्र लागू देखील झाला आहे.
एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच उपलब्ध साठ्यानुसार मागणीचे व्यवस्थापन करण्यासाठी बुकिंगच्या कालावधीत बदल करण्यात आले होते. ग्रामीण भागातील ग्राहकांना यापूर्वी नवीन सिलिंडर बुक करण्यासाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता ही मर्यादा २५ दिवसांवर आणण्यात आल्याने ग्रामीण ग्राहकांना पूर्वीपेक्षा लवकर रिफिल सिलेंडर बुक करता येणार आहे.
शहरी ग्राहकांमध्ये संभ्रम
दरम्यान, शहरी भागातील ग्राहकांसाठी रिफिल बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवरून पुन्हा १५ दिवसांपर्यंत कमी केला जाणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुरवठ्याची परिस्थिती सुधारल्यानंतर ही मर्यादा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी, शहरी ग्राहकांसाठी २५ दिवसांचा कालावधी १५ दिवसांवर कधी आणला जाईल, याबाबत तेल कंपन्या किंवा केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
बुकिंगच्या कालावधीत तफावत का?
एलपीजी सिलेंडरची मागणी आणि उपलब्ध पुरवठा यानुसार तेल कंपन्या वेळोवेळी रिफिल बुकिंगचे नियम बदलतात. मागणी वाढल्यास उपलब्ध साठ्यावर अतिरिक्त दबाव येऊ नये यासाठी दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये ठराविक अंतर ठेवले जाते. याशिवाय अनधिकृत साठेबाजी आणि काळाबाजाराला आळा घालणे हेदेखील बुकिंगच्या कालावधीत अंतर ठेवण्यामागील महत्त्वाचे कारण आहे.
सिलिंडर लवकर संपल्यास पर्याय काय?
घरातील सदस्यांची संख्या, रोजच्या स्वयंपाकाचे प्रमाण आणि गॅसचा वापर किती आहे, यावर एलपीजी सिलिंडर किती दिवस पुरेल हे ठरते. मोठे कुटुंब, दिवसातून अनेक वेळा स्वयंपाक किंवा गॅसवर अधिक पदार्थ तयार केले जात असल्यास सिलिंडर तुलनेने लवकर संपण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन सिलिंडरच्या बुकिंगमध्ये ठराविक दिवसांचे अंतर असल्यास अशा कुटुंबांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत ग्राहक डबल बॉटल कनेक्शन घेण्याचा पर्याय निवडू शकतात. या कनेक्शनमध्ये दोन एलपीजी सिलिंडर उपलब्ध असल्याने एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरा सिलिंडर वापरता येतो. त्यामुळे नवीन सिलिंडर मिळेपर्यंत स्वयंपाकासाठी गॅसची कमतरता भासण्याची शक्यता कमी होते. विशेषतः मोठ्या कुटुंबांसाठी किंवा नियमितपणे अधिक गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.
ग्राहकांनी अधिकृत माहिती तपासावी
एलपीजी बुकिंगच्या नियमांमध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी बुकिंग करण्यापूर्वी संबंधित गॅस वितरण कंपनीच्या अधिकृत माध्यमातून सध्याचे नियम आणि उपलब्धता तपासणे आवश्यक आहे. विशेषतः शहरी ग्राहकांसाठी १५ दिवसांची बुकिंग मर्यादा पुन्हा कधी लागू होणार, याबाबत अधिकृत निर्णय होईपर्यंत सध्याच्या नियमांनुसारच रिफिल बुकिंग करता येणार आहे.
