दिल्लीतील दारूची दुकाने शुक्रवार आणि शनिवार, म्हणजेच 9 आणि 10 ऑक्टोबरला बंद राहणार आहेत. दिल्ली सरकारच्या आबकारी विभागाने गुरुवारी याबाबत आदेश जारी केला. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आबकारी विभागाच्या आदेशानुसार, दोन दिवस दारू विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘मत चोरी’चे आरोप करत विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करत आहेत. विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
10 ऑक्टोबरपासून जंतर-मंतरवर आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीनेही 10 ऑक्टोबरपासून जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये 20 हजारांहून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
जंतर-मंतरवरील आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. परवानगी नसलेल्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
