दोन वेळचा पॅरालिम्पिक पदक विजेता भारताचा स्टार अॅथलीट निशाद कुमार याने २०२६ च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
त्याच्या या कामगिरीसह भारताने दिवसभरात ५ सुवर्णपदकांसह एकूण २४ पदकांची कमाई केली.
मिझुहो अॅथलेटिक स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत निषादने २.०४ मीटर उंच उडी मारत नवा आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला. काल त्याने लांब उडी T47 प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे या स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
निशादने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट लय राखत आपला दबदबा निर्माण केला. त्याने १.८८ मी, १.९४ मी आणि १.९८ मी च्या उड्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्यानंतर २.०२ मीटरची उंची पार करत त्याने सुवर्णपदकावरील आपला दावा मजबूत केला. सुवर्णपदक निश्चित झाल्यानंतर त्याने २.०४ मीटरची उंची पहिल्याच प्रयत्नात लिलया पार करत नव्या आशियाई पॅरा गेम्स विक्रमाची नोंद केली. त्यानंतर २.०६ मीटरचा विक्रम वाढवण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र त्यात त्याला यश आले नाही.
आजचे पदकविजेते
पॅरा ॲथलेटिक्स – पुरुषांच्या थाळी फेक (F43/F44/F62/F64) अंतिम फेरीत देवेंद्र कुमार, राकेश आणि प्रदीप कुमार यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली. पुरुषांच्या थाळी फेक (F51/52/53) अंतिम फेरीत प्रणव सूरमा याने सुवर्ण आणि राम रतन सिंग याने रौप्यपदक जिंकले. महिलांच्या २०० मीटर (T12) अंतिम फेरीत सिमरनने सुवर्ण आणि तेजलबेन दामोरने कांस्य पदक जिंकले. पुरुषांच्या उंच उडीत (T47) अंतिम फेरीत निशाद कुमारने सुवर्ण पदक जिंकले. महिलांच्या ४०० मीटर (T20) शर्यतीत दीप्ती जीवनजीने सुवर्ण पदक जिंकले. महिलांच्या २०० मीटर (T35) अंतिम फेरीत प्रीती पालने रौप्य पदक जिंकले.
पॅरा पॉवरलिफ्टिंग – पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात अशोकने रौप्य पदक जिंकले.
पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल (SH1) अंतिम फेरीत मनीष नरवालने रौप्य पदक जिंकले, तर रुद्रांश खंडेलवाल सातव्या क्रमांकावर राहिला. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल (SH1) अंतिम फेरीत सृष्टी अरोरा हिने कांस्य पदक जिंकले.
पॅरा ॲथलेटिक्स – पुरुषांच्या गोळाफेक (F11) अंतिम फेरीत प्रवीण शर्माने कांस्य पदक जिंकले. पुरुषांच्या गोळाफेक (F56/F57) प्रकारात होकातो होतोझे सेमा याने कांस्य पदक जिंकले. पुरुषांच्या भालाफेक (F53/F54) अंतिम फेरीत प्रदीप कुमारने रौप्य आणि आयुष वर्माने कांस्य पदक जिंकले.
पॅरा टेबल टेनिस – महिला एकेरी (क्लास ३) प्रकारात सोनलबेन पटेल हिने दक्षिण कोरियाच्या यून जियू हिच्याकडून पराभव पत्करल्यानंतर कांस्य पदक जिंकले. महिला एकेरी (क्लास ४-५) प्रकारात भाविना पटेल हिने चीनच्या झांग बियान हिच्याकडून पराभव पत्करल्यानंतर कांस्य पदक जिंकले. प्राची पांडे हिने कांस्य पदक जिंकले. सहाना रवीने कांस्यपदक जिंकले, महिला एकेरीमध्ये चीनच्या माओ जिंगडियानकडून पराभूत. जेहान मदनने पुरुष एकेरी – वर्ग 1 मध्ये कांस्यपदक जिंकले
पॅरा स्विमिंग – हिमांशू नंदलने पुरुषांच्या 400 मीटर फ्रीस्टाइल S11 मध्ये कांस्यपदक जिंकले. निरंजन मुकुंदनने पुरुषांच्या 200 मीटर वैयक्तिक मेडले SM7 मध्ये कांस्यपदक जिंकले
