सात सप्टेंबरला रात्री दहा वाजता तो विवाहवेदीवर चढला. लगेच दुसऱ्या दिवशी (ता. ८) सायंकाळी पाच वाजता अंगावरची हळद निघण्यापूर्वीच विष प्यायला. दीड महिन्यापासून जगण्यासाठी सुरू असलेला त्याचा संघर्ष अखेर आज पहाटे (Youth Consumed Poison Day After His Wedding) थांबला.
अशोक सुरेश यावारी (वय २२, रा. गडहिंग्लज) असे या मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी : आठ सप्टेंबरला विष प्यायल्यानंतर अशोकवर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. नातलग आणि मित्रमंडळी त्याला विष पिण्यामागचे कारण सातत्याने विचारत होते. मात्र, सांगतो.. सांगतो.. म्हणत अखेर तो जीवाला मुकला. त्यामुळे या घटनेमागचे कारणही गुलदस्त्यातच राहिले. काही वर्षांपूर्वी त्याच्या आईचेही निधन झाल्याने घरी तो आणि वडील सुरेश दोघेच राहात होते.
वडिलांच्या जागेवर पालिकेत नोकरी लागल्यानंतर अशोकच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. दुंडगे येथील नात्यातीलच मुलीशी ७ सप्टेंबरला रात्री दहा वाजता त्याची लग्नगाठ बांधली. दरम्यान, त्यांच्या घराचे बांधकामही सुरू होते. मित्रांना फोन करून तो या साऱ्याचे टेन्शन येत असल्याचे सांगत होता.
अंगावरची हळद निघण्यापूर्वीच दुसऱ्याच दिवशी तो सायंकाळी विष प्यायला. त्याला तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दीड महिन्यानंतर त्याचा जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष संपला. सज्जन कांबळे यांनी या घटनेची फिर्याद गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे.



