आजकाल रस्त्यांवर बसवलेल्या हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीचे नियम मोडताच वाहनचालकांच्या मोबाईलवर थेट ई-चालानचा मेसेज येतो. अनेक जण हा मेसेज वाचून दुर्लक्ष करतात किंवा ‘नंतर भरू’ म्हणून दंड प्रलंबित ठेवतात.
मात्र, मोटार वाहन कायद्यानुसार चलन फाडल्यानंतर ते भरण्याची एक ठराविक कालमर्यादा असते. जर तुम्ही ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ ई-चालान भरले नाही, तर तुम्हाला मोठ्या कायदेशीर आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
९० दिवसांत ई-चालान न भरल्यास ‘हे’ ६ मोठे तोटे सहन करावे लागतील:
१. थेट कोर्टात ट्रान्सफर: नियमानुसार, कोणतेही ई-चालान भरण्यासाठी ९० दिवसांची मुदत मिळते. या कालावधीत तुम्ही ऑनलाईन किंवा ट्रॅफिक कार्यालयात जाऊन दंड न भरल्यास, तुमचे चलन आपोआप व्हर्च्युअल कोर्ट किंवा स्थानिक मॅजिस्ट्रेट कोर्टात वर्ग केले जाते. त्यानंतर तुम्ही नेहमीच्या वेबसाईटवरून दंड भरू शकत नाही आणि तुम्हाला कोर्टाच्या कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते.
२. कोर्टाचे समन्स आणि अटक वॉरंट: प्रकरण कोर्टात गेल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आणि पत्त्यावर कोर्टाकडून समन्स किंवा नोटीस पाठवली जाते. अशा वेळी तुम्हाला स्वतः कोर्टात हजर राहून दंड भरावा लागतो किंवा वकिलाची मदत घ्यावी लागते, ज्यात वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातात. कोर्टाच्या नोटिशीनंतरही दंड न भरल्यास न्यायाधीश दंडाची रक्कम वाढवू शकतात किंवा अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करू शकतात.
३. ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC ब्लॅकलिस्ट: गाडीवर जास्त चलने प्रलंबित असल्यास किंवा दीर्घकाळ दंड न भरल्यास आरटीओ तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे आरसी बुक ब्लॅकलिस्ट किंवा निलंबित करू शकते. एकदा कागदपत्रे ब्लॅकलिस्ट झाल्यास तुम्ही गाडीशी संबंधित कोणतेही अधिकृत काम करू शकणार नाही.
४. गाडी विकणे किंवा नावावर करणे अशक्य: भविष्यात तुम्हाला तुमची कार किंवा बाईक विकायची असल्यास प्रलंबित चलन सर्वात मोठा अडथळा ठरते. जोपर्यंत गाडीवरील सर्व थकीत चलने पूर्णपणे भरली जात नाहीत, तोपर्यंत आरटीओकडून वाहनाची मालकी हस्तांतरित केली जात नाही किंवा एनओसी दिली जात नाही.
५. इन्शुरन्स रिन्यूअल आणि क्लेममध्ये अडचणी: आता अनेक राज्यांमध्ये वाहनांचा विमा डेटा परिवहन पोर्टलशी जोडला जात आहे. त्यामुळे पेंडिंग चलन असल्यास इन्शुरन्स रिन्यू करताना अडचणी येऊ शकतात किंवा प्रीमियम वाढू शकतो. तसेच, अपघात झाल्यास इन्शुरन्स क्लेम सेटलमेंटच्या वेळीही प्रलंबित चलनांची तपासणी केली जाते.
६. गाडी जागेवरच जप्त होण्याचा धोका: तुमच्या गाडीवर अनेक चलने दीर्घकाळ थकीत असतील आणि वाहतूक पोलिसांनी तपासणीसाठी गाडी थांबवली, तर पोर्टलवर जुना रेकॉर्ड दिसताच पोलीस तुमची गाडी जागेवरच जप्त करू शकतात.



