ताजी बातमी ऑनलाईन टीम
अनैतिक संबंधातून जन्म झाल्याच्या संशयावरून पोटच्या तीन वर्षीय चिमुकलीचा पित्याने खाली डोके वर पाय करून तिचे डोके भिंतीवर आपटून निघृर्ण खून केल्याचा (crime reports) धक्कादायक प्रकार आंबेगाव बुद्रुक येथील श्रीकृष्ण अपार्टमेंट येथे घडला.जितेंद्र उत्तम पाटील (वय ३३, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुस्कान (वय ०३) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत २४ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा चालक म्हणून काम करतो. तो मुळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. तर, पत्नी गृहिणी असून, ती गोदिंया जिल्ह्यातील आहे. त्यांचा जानेवारी २०२२ मध्ये विवाह झाला होता. तत्पुर्वी जितेंद्र याची पत्नी हिचा पहिला विवाह झालेला आहे. तिला तीन वर्षांची मुस्कान ही मुलगी असल्याचे पती जितेंद्रला सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी तिचा पहिल्या पतीबरोबर घटस्फोट झाल्याचेही तिने जितेंद्र याला विवाहापूर्वी सांगितले होते. तरीही जितेंद्र यांनी हे सर्व मान्य करत विवाह केला होता.
जितेंद्र व त्याची फिर्यादी पत्नी विवाहानंतर आंबेगाव बुद्रुक परिसरातील दुग्गड शाळेच्या पाठीमागे एका सोसायटीत भाड्याच्या खोलीत राहत होते. जितेंद्र याला पत्नीचा पहिला विवाह झालेलाच नसून, ही मुलगी अनैतिक संबंधातून जन्मलेली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याला संशय आल्याने त्यांच्यात गुरूवारी रात्री वाद झाले.
या वादातून त्याने मुस्कान हिचे पाय धरून तिला उलटे करत तिचे डोके भिंतीवर आपटले. मुस्कान बेशुद्ध झाल्याने तिला दोघांनी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. याच दरम्यान तिचा मृत्यू झाला.
पुणे पोलिसांनी खाक्या दाखवताच पालक बोलते झाले
मुस्कानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रुग्णालयाने भारती विद्यापीठ पोलीसांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठपोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गुन्हा दाखल करत जितेंद्र याला अटक केली. तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर करत आहेत.