सातारा पाडेगाव, (ता. खंडाळा) येथील यात्रेसाठी जात असताना टँकरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आजोबासह नातवाचा जागीच मृत्यू झाला. हनुमंत दिनकर धायगुडे (वय- 65), ओम विजय धायगुडे (वय- 12, दोघेही रा.बाळूपाटलाचीवाडी) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातवाचे नाव आहे. घरापासून काही अंतरावर हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडेगावची येथील यात्रेसाठी आजोबा आणि नातू दुचाकीवरून निघाले होते. घरापासून काही अंतरावर पोहोचल्यानंतर तीव्र उतारावर पाठीमागून टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही दूरवर फेकले गेले. आजोबा हनुमंत धायगुडे आणि नातू ओम हे दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघातात नातू ओमचा जागीच मृत्यू झाला. तर काही वेळातच आजोबा हनुमंत धायगुडे यांचाही मृत्यू झाला.
ओम हा पाचवीमध्ये शिकत होता. रात्री साडेनऊ शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करीत आहेत.