नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्याजवळ धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने 90 टक्के भाजल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी (दि. 9) ही दुर्दैवी घटना घडली.
नाशिक तालुक्यातील देशवंडी येथील भीमा संतू कापडी (41) हे दुचाकीने (क्र. एम एच 16/ बी आर 7078) सिन्नरच्या दिशेने जात असताना धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. कापडी यांना काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत भीमा कापडी हे गंभीररीत्या भाजले गेले. मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी धाव घेत त्यांना शहरातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, आगीत शरीर 90 टक्के भाजले गेल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांना आग लागण्याच्या घटना तालुक्यात घडत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी मोहदरी घाटात कार पेटण्याची घटना ताजी असताना ही दुर्दैवी घटना घडली. भीमा कापडी यांचा मृत्यू झाल्याने देशवंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.