बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चेत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती आणि आता चाहत्यांना त्याची झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. हा ट्रेलर पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) या चित्रपटात तुम्हाला रोमान्स, अॅक्शन सर्वकाही पाहायला मिळणार आहे. जवळपास आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरची जबरदस्त आणि वेगळी स्टाइल पाहायला मिळत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सुपरनॅचरल साय-फाय चित्रपटात रणबीर कपूर सुपर पॉवर शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आलिया ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी सर्वांना रोमांचित करणार आहे.
‘ब्रह्मास्त्र शिवा’ असं या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे नाव आहे. या चित्रपटात अनेक सुपरस्टार एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कापडिया आणि साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची खूपच उत्सुकता लागली आहे. युट्यूबवर ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर धुमाकूळ घातल आहे.





