ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती विकासाच्या बाबतीत सक्षम आहेत. त्यामुळे विकासाचे गाजर दाखवून जर शहरात येण्याची सक्ती कराल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही, असा इशारा शुक्रवारी सायंकाळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत देण्यात आला. एकतर्फी निर्णय घेतला तर न्यायालयात जाण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
हद्दवाढविरोधी कृती समितीच्या विनंतीवरून महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी कळंबा येथे हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश असलेल्या गावातील सरपंच, सदस्य यांची बैठक आयोजित करून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगररचना सहायक संचालक रामचंद्र महाजन, जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी हद्दवाढीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर आरक्षणे पडणार नाहीत, पहिली पाच वर्षे घरफाळा वाढणार नाही, शहरात आल्यानंतर संबंधित गावांना विशेष निधी मिळेल, पुरेसा पाणीपुरवठा केएमटी, रुग्णालयांच्या सुविधा मिळतील, असे सांगण्या प्रयत्न त्यांनी केला. यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ उपस्थित होते.
तुम्ही आमच्या गावात आलात तुमचे स्वागत आहे. प्रत्येक गावात स्वागत करू, पण जर हद्दवाढ कृती समितीच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचणार असाल, त्यांच्या सांगण्यावरून आमच्या बससेवा बंद करणार असाल तर तुमची पाणी उपसा केंद्रे आमच्या हद्दीत आहेत, ती बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला.