पंढरपूर येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. अशातच कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) हे कट्टर विरोधक या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील प्रचार सभेत खासदार महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. सतेज पाटील यांनी भीमा सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी विरोधकांना हाताशी धरल्याचा गंभीर आरोप महाडिक यांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सतेज पाटील यांचा भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत काडीमात्र संबंध नाही, असेही महाडिक म्हणाले. तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी कारखान्याच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या. कारखान्याला कर्ज मिळू नये म्हणून पत्र दिली. त्यानंतर आता कारखाना बंद पडावा यासाठी त्यांनी पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील विरोधकांना हाताशी धरले आहे, अशा शब्दांत महाडिकांनी सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली.
मात्र, कारखान्याचे सभासद त्यांचा डाव उधळू लावतील, असा विश्वास ही महाडिक यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे. येत्या 13 नोव्हेंबर रोजी कारखान्याची निवडणूक होणार आहे. कारखाना पंढरपुरमध्ये असला तरी राजकारण मात्र, कोल्हापुरमध्ये रंगत आहे. भामी कारखान्याच्या निवडणुकीत महाडीक, पाटील पुन्हा आमने-सामने आले आहेत.






