आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मॅचविनर खेळाडून किरॉन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम एमआयकडून खेळल्यानंतर त्याने ही निवृत्ती घोषित केली आहे. परंतु मुंबई इंडियन्सने त्याला सोडलेले नाही. एमआयने पोलार्डची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून त्याच्या नवीन भूमिकेत योगदान देणे सुरू ठेवणार आहे.
वन-क्लब मॅन अशी पोलार्डची ओळख
वन-क्लब मॅन, ब्लू आणि गोल्डला जर्सीतील पोलार्डने 2010 मध्ये मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो सलग 13 वर्षे केवळ आणि केवळ मुंबईसाठी खेळला. तेव्हापासून मुंबईसाठी 5 आयपीएल ट्रॉफी आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकून तो या पिढीतील महान खेळाडूंपैकी एक बनला आहे. पण त्याचा शेवटचा हंगाम खूपच निराशाजनक होता आणि त्यानंतर त्याने नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी एक खेळाडू म्हणून ही लीग सोडण्याचा निर्णय घेतला.पोलार्ड नेहमी #MIForever खेळाडूंमध्ये राहिला आहे. त्यामुळे त्याचा अनेक दशकांचा अनुभव आणि कौशल्य मुंबई इंडियन्सला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कामी येणार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली MI Emirates एक मजबूत संघाच्या रुपात तयार होईल अशी संघाला आशा आहे.
मुंबईसाठी जिंकल्या 7 ट्रॉफी
पोलार्डच्या निवृत्तीनंतर नीता अंबानी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, “माझ्यासाठी, पोलार्डने मुंबई इंडियन्सचा अर्थ काय आहे याचे उदाहरण दिले आहे. त्याने MI च्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमच्या दोन्ही चॅम्पियन्स लीग ट्रॉफी आणि सर्व 5 IPL विजयांसाठी तो विजयी संघाचा भाग राहिला आहे. आम्ही MI साठी मैदानावर त्याची जादू पाहिली आहे. परंतु मला आनंद आहे की तो MI Emirates साठी तो खेळत राहील आणि MI चा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करेल. MI आणि MI Emirates सोबतचा त्याचा नवा प्रवास त्याला आणखी मोठे वैभव, विजय आणि पूर्तता मिळवून देईल. मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते” असे नीता अबानी म्हणाल्या.
पोलार्डच्या नावावर 3412 धावां आणि 69 विकेट्स
या अष्टपैलू खेळाडूने आपल्या आयपीएल कारकिर्दीत मुंबईसाठी एकूण 189 सामने खेळले. यात त्याने 16 अर्धशतकांसह 171 डावांमध्ये 3412 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 69 विकेट्सही आहेत. पोलार्डने यापूर्वी आयपीएल 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबईने या लीगमध्ये सर्वाधिक 5 विजेतेपदे जिंकली आहेत आणि या पाच विजेतेपदांमध्ये पोलार्डची भूमिकाही महत्त्वाची होती.






