श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. ही वाढ मागील तीन वर्षांतील खेळाडूंसाठीही लागू होईल. खेळाडूंच्या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांवरून तीन लाख; तर प्रशिक्षकांच्या जीवनगौरव पुरस्काराची रक्कम तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये होईल. देशाचे पहिले ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
गेल्या तीन वर्षांतील पुरस्कारांचे वितरण सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘हे राज्य सरकार खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मुद्रा उमटवण्यासाठी खेळाडूंना सर्व सहकार्य केले जाईल. खेलो इंडिया, राष्ट्रीय तसेच राष्ट्रकुल या क्रीडा स्पर्धांत राज्यातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल मी समाधानी आहे.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय क्रीडा दिनाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, की हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिकपदक जिंकून दिलेल्या खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करावा.
पवार यांनी क्रीडा क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. या क्षेत्रासाठी अजून बरेच काही करायचे आहे. या क्षेत्राला न्याय देण्याची भूमिका घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यपाल बैस यांनी शालेय मुलांमध्ये मोबाईल वापराच्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की मोबाईल गेम खेळत बसल्याने मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत आाहे. या प्रश्नावर उत्तर म्हणून शिक्षणात खेळांचा समावेश केला पाहिजे.
अजुर्न, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी चांगले खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षकाची भूमिका बजावायला हवी. महाराष्ट्राकडे देशाची क्रीडा राजधानी म्हणून पुढे येण्याची क्षमता आहे, हे येथील खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवरून लक्षात येते, असेही त्यांनी नमूद केले. फुटबॉल खेळाच्या वाढीसाठी जर्मनीतील क्लबबरोबर केलेल्या कराराविषयी बैस यांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले एकूण ११९ पुरस्कार या वेळी दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात नमूद केले. केवळ पुरस्कारच नाही, तर अनेक प्रकल्प रखडल्याची टीका त्यांनी केली; मात्र हे का रखडले, आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही, असे सूचकपणे नमूद करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
उपमुख्यमंत्र्यांची विनंती, मुख्यमंत्र्यांची मंजुरी
खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करावा आणि पुरस्कारांच्या रकमेमध्ये वाढ करावी अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्यासाठी दोन कोटी २८ लाख रुपये निधी लागणार आहे. अर्थमंत्री म्हणून तो उपलब्ध करून देण्याची माझी तयारी आहे, मुख्यमंत्र्यांनी संमती द्यावी, असे पवार यांनी नमूद केले. तोच धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहेत. तुमची मान्यता आहे, त्यामुळे पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा मी करतो.’’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -