डीजे दणदणाट… भक्तीभावाने बेधूंदपणे नाचणारे भाविक… कधी वरुणराजाची कृपा… तर कधी ऊन्हाचं पांघरूण… तब्बल 24 तासाहून अधिक काळ मिरवणूक निघाली. परिसर भक्ती आणि शक्तीने, उत्सव आणि उत्साहाने फुलून गेला होता. बघावे तिथे गर्दीच गर्दी दिसत होती. भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. इचलकरंजीत आपल्या लाडक्या राजाला निरोप देताना कुणाचे ऊर भरून आले होते, तर कुणाचा कंठ दाटून आला होता. पुढच्या वर्षी लवकर या… असं सांगताना अनेकांना भरून आलं होतं.
10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर अखेर विसर्जन करण्यात आलं आहे. ढोलताशांच्या दणदणाटात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिरवणूक निघाली. यावेळी हजारो भाविक जमले होते.
डीजेच्या तालावर ठेका धरत भाविक मिरवणुकीत तल्लीन झाले होते. अनेक भाविक तर कुटुंबकबिल्यासह आले होते. यावेळी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर अधूनमधून पावसाची बरसात होत होती. वरुणराजाचा कृपाप्रसाद घेतघेतच ही मिरवणूक आपल्या डौलाने निघाली होती. यावेळी पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन मार्गातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
जेव्हा बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली… तेव्हा अनेकांना गलबलून आले. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले… अनेकांनी बाप्पाला हात उंचावून निरोप दिला… काही गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत होते. तर काहीजण केवळ हातजोडून बाप्पाच्या भव्यदिव्य मूर्तीकडे टक लावून पाहत होते. मनात घालमेल सुरू होती, डोळ्यातून अश्रू वाहत होते.