Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगबेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागात आज काळा दिन; महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी!

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागात आज काळा दिन; महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी!

प्रशासनाने महाराष्ट्रातील काही नेत्यांना बेळगावात येण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रवेशबंदी जाहीर केली आहे.भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी (ता.१) काळा दिन (Black Day) पाळण्यात येणार आहे. यावेळी सीमाभागातील मराठी भाषिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळावा.

 

तसेच, धर्मवीर संभाजी उद्यान येथून सकाळी नऊ वाजता निघणाऱ्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) केले आहे. गेल्या काही दिवसांपासून काळा दिनाबाबत शहर आणि परिसरात जनजागृती करण्याचे काम समितीतर्फे हाती घेतले आहे.

 

तसेच, ठिकठिकाणी बैठका घेऊन फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्वच भागांतून मोठा प्रतिसाद मिळाला असून, बेळगाव शहर आणि तालुक्याच्या विविध भागांतील कार्यकर्त्यांनी फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाल्यानंतर शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहापूर परिसरात फिरून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होणार आहे.

 

त्यानंतर मराठा मंदिर येथे सभेचे आयोजन केले असून, समितीचे नेते यावेळी मराठी भाषिकांना मार्गदर्शन करतील. प्रशासनाने महाराष्ट्रातील काही नेत्यांना बेळगावात येण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रवेशबंदी जाहीर केली आहे. त्याबाबत मराठी भाषिकांनी नाराजी व्यक्त करीत कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक प्रवेशबंदी लागू करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त केले.

 

फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करावेत, तसेच फेरी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहर समिती, तालुका समिती, युवा समिती, शिवसेना व महिला आघाडीने केले आहे.

 

फेरीचा मार्ग असा

 

फेरीची धर्मवीर संभाजी उद्यान येथून सुरुवात होईल. तानाजी गल्ली रेल्वे गेट, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, हेमू कलानी चौक, तासीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाण पूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवाण गल्ली, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, मराठा मंदिर येथे सांगता होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -